जीविका शिक्षण निधी

पतपेढीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या जीविका शिक्षण निधीतून समाजातील दुर्बल घटकांना तसेच पतपेढीच्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य करण्याची योजना सुरू केली आहे. या निधीचा सुयोग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने व पतपेढीच्या सर्व स्तरावरील सभासदांना यात सामावून घेण्याच्या दृष्टीने शिक्षण निधीतून प्राथमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक व पदवी पदव्युत्तर शिक्षण यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. आजपर्यंत या निधीतून पाऊण कोटीहून अधिक रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे.

डिसेंबर २०१३ मध्ये आपल्या जीविका पतपेढीचा रौप्य महोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. सन्मा. बिशप फेलिक्स मच्याडो ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर ठाणे जिल्हा उपनिबंधक मान. काळेसाहेब व थोर अर्थतज्ञ मान. चंद्रशेखर टिळक हे प्रमुख पाहूणे होते. पूर्ण आठवडाभर प्रबोधन, प्रशिक्षण आदी स्वरूपात हा कार्यक्रम साजरा झाला. जिविका शिक्षण निधीची स्थापना देखील काळाची गरज ओळखून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. पतपेढीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने सभासदांना काही भेटवस्तू द्याव्यात या उद्देशाने दरवर्षी नफ्यातून काही रक्कम बाहेर काढण्यात आली. ५ वर्षात ही रक्कम ५१ लक्ष रुपये इतकी जमा झाली. जुलै २०१३ च्या वार्षिक सभेत सभासदांना भेटवस्तू देण्यावर चर्चा करताना भेटवस्तू देणे हे क्षणिक आहे. पण ह्या ५१ लक्ष रुपयावर एक ट्रस्ट केला तर ते चिरंतन असेल सभासदांचे मत झाले व ही सर्व रक्कम आपल्या मंडळाकडे सुपूर्त करून त्याचा जिविका शिक्षण निधी स्थापन करण्यास सभेने मंजूरी दिली. हा निधी कायमस्वरूपी मुदत ठेवीत ठेवून त्याच्या मिळणाऱ्या व्याजातून सभासदांच्या पाल्यांना तसेच समाजातील गरीब, गरजवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यास सभेने मंजूरी दिली. मंडळाने पुढाकार घेऊन प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेतून रु. १० लक्ष आणि स्व. सेबेस्टियन आल्मेडा स्मरणार्थ माजी संचालिका सन्मा. सांतानबाई आल्मेडा ह्यांनी रु. ५१ हजाराची देणगीची भर घालून अशाप्रकारे रु. ६१.५० लक्ष निधी आपल्याच पतपेढीमध्ये कायमस्वरुपी गुंतविण्यात आला. पहिले वर्ष २०१३-१४ मध्ये फक्त व्याज जमा करण्यात आले व आर्थिक वर्ष १४-१५ पासून दरवर्षी मिळणारे व्याज आपण गरीब गरवंत विद्यार्थ्यासाठी वापरत आहोत. गेल्या ५ वर्षात ह्या निधीच्या व्याजातून रु. २८ लक्ष चा रक्कमेचा १००० विद्यार्थ्याना फायदा देण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

ही योजना दोन टप्प्यात अंमलात आणली आहे. १ ला टप्पा इ. १ ली ते १२ वीचे विद्यार्थी. त्यांची शालेय फी, गणवेश पाठ्यपुस्तके आदी खर्च ना परतावा पद्धतीने कायमस्वरूपी दरवर्षी दिली जाते. तर २रा टप्पा १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या पतपेढीतून शैक्षणिक कर्ज घेऊन त्यावर होणारे व्याज ह्या निधीतून दिले जाते. तसेच रु. ५० हजाराच्या मर्यादेत आपण कर्जरुपाने बिनव्याज रक्कम कॉलेज/ संस्था ह्या नावाने विद्यार्थ्यांना देतो व त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर ह्या कर्जाची परतफेड करावयाची आहे. ही अतिशय चांगली योजना असून समाजातल्या वंचित घटकासाठी आपण ती कार्यरत केली आहे.

ह्या योजनेत सुरूवातीला जमलेल्या रू. ६१.५० लक्ष निधीत वारंवार भर पडत गेली आहे. पतपेढीचे संचालक, कर्मचारी वर्ग ह्यांनी वैयक्तिक देणगी देऊन त्यात भर टाकली आहे. पतपेढीही दरवर्षीच्या नफ्यातून त्यात भर घालत आहे. पतपेढीचे उमराळे शाखेचे माजी संचालक स्व. अंतोनी जोसेफ घोन्सालविस ह्याच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियाने ५१ हजार देणगी दिली आहे. तसेच श्री. राजू फ्रान्सिस दोडती यांनीही रु. ५१,००० ची देणगी दिली आहे. चालू वर्षी कॅथॉलिक बँकेनेही रू. ५ लक्ष देणगी देऊन आता ३१ डिसें. १८ अखेर हा निधी रु. ८३ लक्ष पर्यंत पोहोचला आहे. हिरक महोत्सवी सांगता सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या कार्यकर्त्यांनी गोळा केलेले दान ह्या निधीत भर घालणार आहे. तसेच जीवन विकास नागरी पतपेढी व कॅथॉलिक बँकही आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे लवकरच हा निधी रु. १ कोटी पर्यंत पोहोचलेला असेल ह्यात शंका नाही. घसरते व्याजदर व वाढती मागणी ह्यामुळे मिळणारे वार्षिक रु. ८ लक्ष व्याजही कमी पडणार आहे. परंतु देवावर भरवसा असला तर घरधन्याला काहीही कमी पडणार नाही ह्या उक्तीप्रमाणे आपण ह्या शिक्षण निधीत अजून भर घालून समाजाची, वंचित घटकांची गरज भागवू अशी आम्हास आशा आहे.