चेतना पुस्तकालय

चेतना पुस्तकालय हे मंडळाच्या कार्याचा मानबिंदू आहे. १९६० साली ह्या वाचनालयाची स्थापना करण्यात आली. दर्जेदार आणि वाचनीय ग्रंथसंपदा, संदर्भ साहित्य व सेवासुविधांनी हे वाचनालय परिपूर्ण आहे. ग्रंथालयात महिला व बालकांसाठी स्वतंत्र अद्ययावत कक्ष तयार करण्यात आला आहे. जास्तीतजास्त वाचक आणि विशेषत: बालकांना आकर्षित करण्यासाठी ग्रंथालयातील मांडणी व आसन व्यवस्था आकर्षक करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. या वाचनालयात सर्व भाषिक मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, दिवाळी अंक आहेत, तर २७ हजारांहून जास्त ग्रंथ, पुस्तके आहेत. संदर्भग्रंथांची ५००० पुस्तके आहेत. इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असून त्याचा वापर विनामूल्य उपलब्ध आहे तसेच २४ तास खुली अभ्यासिका असून अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. वसई तालुक्यातील हे पहिले ‘अ’ वर्गीय ग्रंथालय असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय (ग्रामीण भाग) पुरस्कार सलग दोन वेळा मिळाला आहे.

जीवन विकास मंडळाने रेव्ह. फा. जोसेफ व्हिक्टोरिया प्रमुख धर्मगुरू, होली क्रॉस चर्च ह्यांच्या निवासामधील एका खोलीत १० जानेवारी १९६० रोजी चेतना पुस्तकालय नामक वाचनालयाची स्थापना केली. सुरुवातीला संस्थेच्या सभासदांना, परिसरातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना व ग्रामपंचायत सदस्यांना पुस्तके घरी वाचावयास नेण्यासाठी विनामूल्य देण्यात येऊ लागली. परंतु चर्चवर येऊन पुस्तकाची देवाणघेवाण करणे वाचकाना गैरसोयीचे होऊ लागल्याने, त्यावेळचे होली क्रॉस हायस्कूलचे प्राचार्य ख्रि. रेव्ह. फा. डॉमनिक आब्रिओ (नंतरचे बिशप) यांनी प्राथमिक शाळेचा एक वर्ग पुस्तकालयासाठी मोफत वापरावयास दिला. सरकारी नियमानुसार मिळणारे अनुदान मंजूर झाले. त्याचबरोबर परिसरातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून लहानमोठ्या देणग्या प्राप्त होऊ लागल्या. त्याद्वारे दरवर्षी पुस्तकांच्या संख्येत भर पडू लागली. संस्थाही दरवर्षी होणाऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून काही भाग पुस्तकालयाकडे वर्ग करु लागली. ह्या निधीद्वारे चेतना पुस्तकालय दरवर्षी मंडळाच्या परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक बक्षिसे देऊ लागले.

पुस्तकालयाचा ग्रामीण वाचनालय म्हणून ‘वर्गात प्रवेश व्हावा म्हणून मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नाला लागले. त्यासाठी १९७० साली निर्मळ येथील कोरिया सदनमधील एक खोली भाड्याने घेऊन पुस्तकालयाचे स्थलांतर त्याठिकाणी केले. १९७२ साली संस्थेने इमारत बांधण्यासाठी जागा खरेदी केली. लवकरच वाचनालयास ग्रामीण वाचनालयचा वर्ग मिळाला. राजा राममोहनराय ट्रस्टकडून पुस्तकांची दरवर्षी मोठी देणगी मिळू लागली. तसेच लायन्स क्लब ऑफ जोगेश्वरी व कुर्ला (मुंबई) यांच्याकडून देणगी मिळाली. ज्याप्रमाणे वाचन करून ज्ञान प्राप्त होते त्याचप्रमाणे श्रवणाने ज्ञान संपादन करण्याची संधी प्राप्त व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संस्थेने १९७७ पासून व्याख्यानमाला सुरु केली. सुप्रसिद्ध साहित्यिक, संपादक, शिक्षण तज्ज्ञ, विचारवंताची निवड करुन निर्मळ परिसरातील आम जनतेसाठी श्रवणीय ज्ञानाची पर्वणी सुरु झाली. वर्धापनदिन अथवा महत्त्वाच्या दिवशी असे व्याख्यानाचे कार्यक्रम संस्थेने सुरु केले. १९८० साली आंतरराष्ट्रीय बालवर्षानिमित्त प्रा. नेरुरकर ह्यांचे व्याख्यान आयोजित करून पुस्तकालयातंर्गत बालवाङ्:मय विभाग सुरु केला. तसेच होली क्रॉस हायस्कूल निर्मळ व निर्मळ विद्यालय येथून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संस्थेच्या प्रत्येक वर्धापनदिनी बक्षिसे देऊन गौरव केला. गोम्सआळी परिसरातील सभासदांना पुस्तकांची देवाणघेवाण करणे कठीण जात असल्यामुळे १९८१ साली चौकाळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुस्तकालयाची एक शाखा सुरु केली. कार्यकर्त्यांमार्फत त्याठिकाणी पुस्तक संचय करुन पुस्तकांची देवाणघेवाण सुरु केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तीन वर्षानंतर ती शाखा बंद करण्यात आली.

निरनिराळ्या लेखकांची व निरनिराळ्या विषयांची पुस्तके वाचकांना हाताळता यावीत म्हणून अधूनमधून ग्रंथ प्रदर्शने भरवून वाचकांचे लक्ष वेधण्याचे काम वाचनालयाने चालू ठेवले होते. तसेच दिवाळीच्या कालावधीत प्रसिद्ध होणारे अनेक दिवाळी अंक सभासदांना माफक वर्गणीमध्ये हाताळता यावेत ह्यासाठी दिवाळी अंकाची योजना सुरु केली. मंडळाच्या नियोजित वास्तूचे उदघाटन झाल्यामुळे १९८४ साली चेतना पुस्तकालयाचे स्थलांतर मंडळाच्या मालकीच्या इमारतीमध्ये झाले. ह्याच वर्षी ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन भरविण्याचा मान आपल्या संस्थेला मिळाला. त्यावेळी वाचनालयाचे कार्यवाह स्व. अंतोन करास हे होते. सदर अधिवेशन दि. ९ डिसेंबर १९८४ रोजी श्री. टिकेकर, ग्रंथपाल मुंबई विद्यापीठ ह्यांच्या अध्यक्षतेखाली, श्री. रॉक कर्व्हालो, लेखक-कवी, प्रमुख अतिथी श्री. चहांदे, ग्रंथालय संचालक हे उपस्थित होते. सदर अधिवेशनात ठाणे जिल्ह्यातील १५० हून अधिक ग्रंथालयाचे प्रतिनिधी हजर होते. १९८५-८६ साल हे चेतना पुस्तकालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले. त्यावेळी श्री. रॉक आल्मेडा वाचनालयाचे कार्यवाह होते. सुरुवात ग्रंथ प्रदर्शनाने झाली. ह्यावेळी कला-क्रीडा विभागाने क्रिकेट टुर्नांमेंट व व्हॉलीबॉलच्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडल्या. तसेच निर्मळ विद्यालयाच्या हॉलमध्ये खुली निबंध स्पर्धा आयोजित केली. ३० मार्च १९८६ रोजी साजरा केलेल्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तत्कालीन आमदार डॉमनिक घोन्सालवीस यांनी भूषविले होते. चोखंदळ वाचक वर्ग पुस्तकालयाकडे आकर्षित व्हावा व वाचकांची संख्या वाढावी म्हणून पुस्तकालयातर्फे निरनिराळे कार्यक्रम राबविले जात असत.

सन १९८७ साली सहकार फंडाच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त एक भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शन आठवडाभर वाचकांसाठी खुले होते. ग्रंथालय हे मंडळाच्या कार्याचा केंद्रबिंदू समजून मंडळ कार्यरत असल्यामुळे ह्या कार्याची दखल घेऊन १९८९-९० साली आपल्या ग्रंथालयाला महाराष्ट्र सरकारने राज्यातील उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दुसऱ्यांदा देऊन गौरविले. त्यावेळी चेतना पुस्तकालयाचे उपाध्यक्ष श्री. डॉमनिक डिसोजा यांनी ग्रंथालय दर्जा सुधारण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. पुस्तकालयाच्या वतीने हा पुरस्कार त्यावेळचे कार्यवाह श्री. आशिष लोपीस ह्यांनी स्वीकारला. त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून चेतना पुस्तकालायस ग्रामीण वाचनालयाचा वर्ग प्राप्त झाला. त्यामुळे अनुदानात वाढ झाली. दरवर्षी निरनिराळ्या कार्यक्रमाद्वारे जनजागृतीचे काम चालू असताना, आपल्या वाचनालयात डिसेंबर १९८९ मध्ये मुंबई विभागाचे ग्रंथालय संघाचे अधिवेशन भरविण्यात आले होते. वसईत अनेक गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी शालांत परिक्षेत चमकतात परंतु शासकीय सेवेत जाऊन सेवा करण्याकडे त्यांचा कल नसतो. यामुळे शासन सेवेत या परिसरातील लोकांचे उचित प्रतिनिधित्व नाही हे विचारात घेऊन राज्य शासनाच्या सेवेतील उच्च दर्जाच्या राजकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन करण्याचा उपक्रम मंडळाने १९९७-९८ मध्ये हाती घेतला. श्री. जे. आर. मेनन, कु. ज्योती गुडेकर यांच्यासारख्या तरुण अधिकाऱ्यांना बोलवून विद्यार्थी पालकांसमोर व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली.

वाचनालयाचा दर्जा ‘वर्ग झाल्याने पुस्तकालयात पुस्तकाप्रमाणे इतर वाचनीय साहित्याची भर पडली. त्यात २० दैनिके, ११ साप्ताहिके, ६ पाक्षिके, तर ३६ मासिके व ५० दिवाळी अंक उपलब्ध केले जाऊ लागले. पुस्तकालयाची धडपड वर्ग मिळविण्यासाठी सुरु झाली होती.

आपल्या मंडळाच्या इमारतीमध्ये ३१ जानेवारी १९९९ रोजी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनाला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून १२५ ग्रंथालयाचे २०० प्रतिनिधी उपस्थित होते. अध्यक्षस्थान मॉन्सि. फ्रान्सिस कोरिया यांनी भूषविले होते. तर प्रमुख अतिथी, श्री. जोसेफ तुस्कानो, विज्ञान लेखक, श्री. रॉबर्ट डाबरे, संगणक तज्ज्ञ, डॉ. रमेश कुबल, विद्यावर्धिनीचे प्राध्यापक, तसेच शासनाचे प्रतिनिधी म्हणून श्री. रा. ज. मेढेकर, ग्रंथालय उपसंचालक तसेच डॉ. बि. ए. सनान्से व श्री. शाम दाईगडे, ग्रंथालय सहाय्यक संचालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ग्रंथालयाच्या विविध अडचणीवर चर्चा झाली. यावेळी भव्य असे ग्रंथप्रदर्शन नावीन्यपूर्ण पद्धतीने भरविण्यात आले होते. पुस्तकालयाची गेल्या ४० वर्षाची अखंड घौडदौड चालू असताना दिनांक २६ नोव्हेंबर १९९९ रोजी महाराष्ट्र शासनाने ग्रंथालयाला वर्गाचा दर्जा बहाल केला. संस्थेचे कार्यकर्ते, देणगीदार, हितचितंक ह्यांच्या प्रयत्नाची फलश्रुती झाली. कारण वर्गात पर्दापण करणारे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे एकमेव वाचनालय होते. दिवसेंदिवस वाचनालयाची प्रगती, वाचकांचा व कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेऊन मंडळाने ४३व्या वर्धापनदिनी म्हणजे रविवार दिनांक १८ नोव्हेंबर २००१ रोजी ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. सकाळी ९ वा. निर्मळ नाका ते वाघोली, मर्देस, रांबाई मार्गे नवाळे ते संस्थेचे कार्यालय असे दिंडीने मार्गक्रमण केले. वसईतील प्रसिद्ध आरोग्यसेवक व दानशूर डॉ. बी. ए. खरवडकर ह्यांनी दिंडीची विधीवत पूजा करुन सुरुवात झाली. लेझीम, ढोल व ताशाच्या जल्लोषात शेकडो लोक, वाचक व कार्यकर्ते ह्यांच्या सहभागाने संपूर्ण मार्गावर हारतुरे स्वीकारीत ग्रंथदिंडी संपन्न झाली. वाचन चळवळीचा प्रचार व प्रसार व्हावा, जनतेला ग्रंथाची ओळख व्हावी, म्हणून पारंपारिक पद्धतीने बैलगाडी सजवून ग्रंथाचे भांडार वाचकाच्या दारापर्यंत नेण्याचा हा प्रयोग स्व. मायकल परेरा यांच्या नेतृत्वाखाली पुस्तकालयाने केला. त्यावेळी भव्य असे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच ग्रंथालय चळवळ- लेखक, प्रकाशक, वाचक सहभागह्या विषयावर सुप्रसिद्ध लेखक प्रा. सुभाष भेंडे ह्यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

आपल्या शासनमान्य ‘वर्गीय मुक्त द्वार वाचनालयास सन २००४-०५ सालाचा ग्रामीणभागातील उत्कृष्ट वाचनालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरपुरस्कार मिळाला. त्यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री. फिलीप दोडती व कार्यवाह सुनिल रॉड्रिग्ज हे होते. मा. मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख ह्यांच्या हस्ते, मानपत्र व रोख ५०,०००/- देऊन शासनाने आपल्या पुस्तकालयास गौरविले होते. ह्या पारितोषिक वितरण सोहळ्यास मंडळाचे ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

आपले ग्रंथालय हे शासनमान्य अ वर्ग ग्रंथालय आहे. दरवर्षी शासन परिरक्षण अनुदान देत असते. आपण वार्षिक १००/- रु. इतक्या नाममात्र वर्गणीत विविध विषयावरील ग्रंथ घरी वाचण्यास उपलब्ध करुन देतो. ग्रंथालयात वाचन कक्षात मात्र कोणत्याही व्यक्तीला ग्रंथ व वाचनीय साहित्य विनामूल्य वाचता येते. तसेच वयस्कर व नोकरीधंदा करणाऱ्या वाचकांना नेहमीच वाचनालयात येणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी ‘ग्रंथालय आपल्या दारीह्या योजनेअतंर्गत घरपोच ग्रंथ योजना सुरु आहे. संस्थेच्या ४८व्या वर्धापनदिनानिमित्त उन्हाळाच्या सुट्टीत बालग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यात ३०० बालवाचकांनी सहभाग घेतला. त्यासाठी इंग्रजी, मराठी व हिन्दी वाचनीय साहित्य ठेवण्यात आले होते. मुलांना आकर्षण वाटावे म्हणून खाऊची व्यवस्था, परिसरातील दानशूर कार्यकर्त्यांच्या मदतीने केली गेली होती. आज एकूण वाचक सभासद संख्या ७५० असून आपल्या ग्रंथालयाची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ३१,००० इतकी आहे. रोज आपल्याकडे २७ दैनिक येतात. त्याप्रमाणे ७५दिवाळी अंक, ११ साप्ताहिके, ७ पाक्षिके व ५६ मासिके येतात. आपले ग्रंथालय हे वसई तालुक्याच्या सांस्कृतिक इतिहासात एक मानाचे पान ठरले आहे. इतकी विपुल व वैविध्यपूर्ण ग्रंथसंपदा उपलब्ध असलेले ज्ञानभंडार वसई तालुक्यात इतरत्र नाही. काळाची गरज ओळखून ज्ञानप्रसारासाठी तरुण व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासूसाठी मंडळाने ग्रंथालयाच्या माध्यमातून २४ तास खुले असलेले अभ्यास कक्ष उभारण्याचा संकल्प सुवर्ण महोत्सवानिमित्त केला होता. संदर्भ साहित्य व इंटरनेट सुविधासह मंडळाने तयार केलेल्या आधुनिक अभ्यास कक्षाचे उदघाटन दि. २५ जाने. २००९ रोजी उद्योजक सर्वश्री क्लॅरी रॉड्रीग्ज व लेमॉस डिसोजा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी सुवार्ता मासिकाचे संपादक फा. अॅण्ड्र्यू रॉड्रीग्ज व बॅसीन कॅथोलिक बँकेचे माजी चेअरमन स्व. श्री. मायकल फुट्याडो उपस्थित होते. मंडळाने सुरु केलेल्या स्टडी रुम हा प्रकल्प वसई परिसरातील अभ्यासकांचे आकर्षण आहे. वाचनालयाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणारे डॉमनिक डिसोजा, खंडू मास्तर, अंतोन करास, रॉक आल्मेडा, नेल्सन दोडती, सुनिल रॉड्रीग्ज हे कार्यकर्ते होते.

चेतना पुस्तकालयाचा सुवर्णमहोत्सव सांगता सोहळा रविवार ०१ मे २०११ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी समाजकार्यात मोलाची कामगिरी करणारे थोर समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे हे उपस्थित होते. त्यांच्या सेवाकार्यासाठी मंडळाच्या आवाहनाला वसई भरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे रुपये ५ लाख इतकी भरीव देणगी त्यांना या समारंभात अर्पण करण्यात आली. ०५ ते ०८ नोव्हेंबर २०१० या दिवशी सुवर्णमहोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

पतपेढीच्या सभासदांमध्ये वाचन अभिरुची वाढवण्यासाठी त्यांना वर्गणी दरात सवलत देण्यात आली आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन तसेच ‘माझा वाचनानुभव या विषयावर परिसंवाद २३ फेब्रुवारी २०१३ रोजी घेण्यात आला होता.

साहित्यपान हा काव्यक्षेत्रातील एक वेगळा अनुभव देणारा अभिनव कार्यक्रम २७ सप्टेंबर २०१५ रोजी घेण्यात आला होता. तसेच स्थानिक बोलीभाषा कादोडीसाहित्यकृतीचा समावेश मराठी भाषादिनाच्या कार्यक्रमात झाला तसेच फेलिक्स डिसोजा यांचा “नोंदीनांदी” पुस्तक प्रकाशन सोहळा व वसई युवा कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ०४ मार्च २०१८ थोर साहित्यिका वीणा गवाणकर यांचा सहवास मराठी भाषा दिनानिमित्ताने लाभला होता.