कला व क्रीडा विभाग
१९७० साली स्थापन झालेल्या कलाक्रीडा विभागाने गेल्या वर्षी आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. तरुणांसाठी खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या संस्थेमार्फत क्रीडास्पर्धा भरवण्यात येतात. कला-क्रीडा विभागातर्फे गेली काही वर्षे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दिपावली सूरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच कोरोनाचा कहर आटोपल्यानंतर भव्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्याचे विचाराधीन आहे. तसेच योगाचे प्रशिक्षण वर्ग चालू करण्यात आले आहेत.
संस्थेच्या ध्येय धोरणाला अनुसरुन तरुणांच्या कला गुणांना वाव मिळावा व त्यांची शारीरिक जोपासना व्हावी म्हणून ४ ऑक्टोबर १९७० साली प्रगती कला-क्रीडा व मनोरंजन या विभागाची स्थापना करण्यात आली. कबड्डी सारख्या देशी खेळाने सुरुवात करुन, ह्या विभागाने क्रिकेट सारख्या विदेशी खेळापर्यंत मजल मारली, त्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या. आपले संस्थापकीय सदस्य श्री. जोसेफ दालमेत ह्यांचे मुंबईतील दानशूर मित्र व क्रिकेटप्रेमी श्री. आर. बी. एफ. कुक्का ह्यानी आपल्या स्व. पित्याच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट सुरु करण्यासाठी चांदीची ढाल दान केल्यामुळे स्व. बेहरामजी कुक्का स्मारक क्रिकेट टुर्नामेंट १९७४ पासून सुरु करण्यात आली. तसेच संस्थेचे एक हितचिंतक श्री. जी. ए. काझी, सोपारा ह्यांच्या मध्यस्थीने उपविजेता संघासाठी, पैगंबर वासी नाना हॅरीस कप ठेवण्यात आला. सदरहू स्व. बेहरामजी कुक्का क्रिकेट टुर्नामेटला मुंबई क्रिकेट असोशियनने अधिकृत मान्यता दिली होती. ही टुर्नामेंट वसई तालुक्यातील मान्यवर तीन टुर्नामेंट पैकी एक गणली जाऊ लागली. खेळाची अधिक आवड निर्माण व्हावी म्हणून कबड्डीच्या स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या व विजेत्या संघास जीवन विकास मंडळाच्या वर्धापनदिनी स्व. बेहरामजी कुक्का स्मारक क्रिकेट टुर्नामेंट ढाल देण्यास सुरुवात केली.
लायन्स क्लब ऑफ जोगेश्वरी मुंबई यांच्याकडून, व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी, “लायन्स क्लब जोगेश्वरी व्हॉलीबॉल कप” मिळाल्यामुळे, व्हॉलीबॉलच्या स्पर्धाही सुरु करण्यात आल्या. परिसरातील सर्व गावातील तरुणवर्ग विविध स्पर्धात्मक खेळामुळे संस्थेकडे आकर्षित होऊ लागला. सन १९७९-८० ह्या वर्षात बालकवर्ष साजरे करण्यात येऊन ४ माध्यमिक व ७ प्राथमिक शाळेतील १० व १६ वर्षाखालील गटात मुलांमुलींच्या विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तसेच व्यायामशाळा चालू करण्याच्या दृष्टीने मंडळाने निर्मळ ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर पंचायतीच्या परवानगीने एक तात्पुरती बांबू झावळ्याची शेड उभी केली होती. त्याचे उदघाटन २३व्या वर्धापनादिनी अॅड. रमेश जोशी ह्यांच्या हस्ते व सरपंच निर्मळ ग्रामपंचायत ह्यांच्या उपस्थित करण्यात आले. संस्थेचे त्यावेळचे विश्वस्त श्री. डॉमणिक डिसोजा व तरुण कार्यकर्ते ह्यांची क्रीडा विभाग यशस्वीपणे चालवून तसेच सोपारा येथे शुर्पारक क्रीडा मंडळाच्या सहकार्याने सामने भरवून परिसरातील तरुण कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम केले.
संस्थेला क्रीडा विषयक कार्य करण्यासाठी क्रीडांगण असणे अत्यंत आवश्यक होते. ह्याकरिता कळंब खाडीवर बांधारा घातल्यामुळे निर्माण झालेल्या खार जमिनीवर भराव करुन क्रिकेटसाठी क्रीडांगण तयार केले होते. लवकरच क्रिकेट करिता टफ विकेट तयार करण्याचा मंडळाचा मानस होता. परंतू काही तांत्रिक अडचणीमुळे संस्थेला ते शक्य झाले नाही. मोठ्या प्रमाणात केलेली मेहनत व खर्च केलेला निधी वाया गेला. तरुणांची खेळाची आवड ध्यानात घेऊन वाघोली येथील वाघेश्वरी मंदिराच्या पलिकडील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची सर्व्हे नं. २०५ मधील ५ एकर जमीन संस्थेला क्रीडागंणासाठी द्यावी म्हणून वाघोली ग्रामपंचायतीने मंजूरी दिली होती. त्यावेळचे त्यांचे सरपंच कै. विनायक चोरघे यांच्या हस्ते उदघाटन होऊन टुर्नामेंटही सुरु झाल्या होत्या. काही कारणाने क्रीडागणांसाठी संस्थेच्या तरुण उत्साही कार्यकर्त्यांनी होली क्रॉस हायस्कूलच्या मैदानावर प्रत्येक वेळी, प्राचार्याची पूर्व परवानगी घेऊन, खेळाचे सामने भरविण्याची प्रथा सुरु ठेवली. दिनांक २४ सप्टेंबर १९८९ च्या स्नेहसंमेलनांत श्री. एलायस रोझारिओ ह्यांच्या अध्यक्षतेखाली कला-क्रिडा विभागाची पुनर्रचना करण्यात येऊन युवकांवर कामाची जबाबदारी सोपविण्यात आली.
निधी अभावी संथगतीने चालू असलेल्या व्यायमशाळेच्या कामास गती यावी म्हणून ३६व्या वर्धापन दिनी २६-०१-१९९४ रोजी श्री. रॉबर्ट डाबरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली निधी जमविण्याच्या कार्याला गती देण्यात आली. युवा विभागाचे दरवर्षी निरनिराळ्या खेळाचे सामने भरविणे चालूच होते.
आपल्या संस्थेच्या हॉलमध्ये, सुवार्ता परिवार व जीवन विकास मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नाने योगाभ्यास शिबिरे आयोजित करण्यात आली होती. ठाण्याच्या श्री. अंबिका योग कुटीरच्या कार्यकर्त्यांनी या शिबिरांत मार्गदर्शन केले. २००४ साली सप्टेंबर ते डिसेंबर आणि २००७ साली मे ते ऑगस्ट या काळावधीत योग शिबिरांसाठी ग्रंथालयाचे चिटणीस सुनिल रॉड्रीग्ज यांनी विशेष पुढाकार घेतला. सदर शिबिरांचा निर्मळपासून वसई, आगाशी, अर्नाळ्यापर्यंतच्या अनेक लोकांनी लाभ घेतला.
४६व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. दीपक देसाई, विरार ह्यांनी टेबल टेनिसचे टेबल व इतर साहित्य देणगी म्हणून दिले तसेच दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी रु. ५०००/- देणगी तहयात देण्यास सुरुवात करुन दरवर्षी त्यात वाढ करून रु.१५०००/- देत आहेत. संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये कॅरम व चेससारखे इनडोअर गेम सुरु केले.
विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत व्हर्सटाईल डान्स अॅकेडमीचे संचालक श्री. उदय पवार ह्यांच्या सहकार्याने ४ एप्रिल ते १७ मे २००६ ह्या कालावधीत नृत्यकला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. भाग घेतलेल्या मुलांचे कौतुक करण्यासाठी २७ मे २००६ ह्या दिवशी ‘आपले कौतुक‘ नावाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत बालकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी चित्रकला, नृत्यकला इत्यादी कला प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने योजले जातात.
बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी २००९च्या दिवाळी सुट्टीत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली, मंडळाच्या पुढाकाराने कृषी अधिकारी व शेतकरी यांचे चर्चासत्र ०३ सप्टेंबर २०११ रोजी आयोजित करण्यात आले होते तसेच ०५ नोव्हेंबर २०११ रोजी आयुर्वेदिक कृषी उत्पादनाच्या फायद्यासंबंधी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. २२ ऑक्टोबर २०१५ रोजी कोरिगड किल्ला, लोणावळा येथे ट्रेकिंग आयोजित करण्यात आले होते. मुलांसाठी चित्रकला प्रशिक्षण वर्ग तसेच युवकांसाठी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा तसेच फॅशन डिझायनिंग व ब्युटीपार्लर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.