जीवन विकास मंडळाविषयी

समर्पित सेवेची ६८ वर्षे

इतिहास हा भूतकाळाचा ठेवा, भविष्यकाळाचा दीपस्तंभ व वर्तमानकाळाचा प्रेरक असू शकतो. गतकालाच्या अनुभवातून भविष्यकाळाचा मार्ग दाखविण्याचे काम इतिहास करीत असतो. सामाजिक कार्याचा विकास कसा होत गेला, त्याची गोळा बेरीज ही इतिहासामुळे साध्य होऊ शकते अशा प्रकारे वर्तमानकाळाचे परीक्षिलन करुन त्याआधारे भविष्यकाळासाठी धोरण ठरविणे इतिहासामुळे शक्य होते. सामाजिक कार्याचा विचार आणि ध्येय धोरणे यामधील उत्क्रांती तत्वे समाजवून सांगणाऱ्या, संस्थेची विविध कार्याची महती आणि माहिती भावी पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरावी म्हणून जीवन विकास मंडळ आपल्या या सात दशकाच्या यशस्वी वाटचालीच्या आठवणीना उजाळा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सामाजिक संस्था, निरपेक्ष सेवेने व निःस्वार्थी बुद्धीने कशा उभ्या केल्या जातात तसेच अशा संस्थेचे कार्यकर्ते आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक बांधिलकी कशी पार पाडू शकतात, याच वस्तुपाठच मंडळाच्या कार्याच्या त्रोटक अहवालामुळे आपल्या समोर येईल.

संक्षिप्त इतिहास

जीवन विकास मंडळाच्या समर्पित सेवेची ६८ वर्षे

कुठलाही प्रपंच मग तो एखाद्या व्यक्तीचा असो, अथवा सामाजिक संस्थेचा असो तो कसा विकसित होत गेला याचा मागोवा घेताना त्याचे मूळ स्वरूप डोळ्याआड करता येणार नाही. विविध प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून आज ६८ वर्षाच्या कालावधीत नेटाने मार्गक्रमण करीत असलेले व चहूअंगाने विकसित झालेले आजचे मंडळ पाहिल्यानंतर त्याचे मूळ स्वरूप जाणून घेणे तेवढेच महत्त्वाचे असेल यात तिळमात्र शंका नाही. एकंदरीत सामाजिक गरजांचा विचार करता, गेल्या ६८ वर्षापूर्वी आपला हा निर्मळ परिसर नावाप्रमाणे प्रत्यक्षात निर्मळ व पवित्र पूण्यभूमी म्हणून ख्यातनाम होता. हिरव्या वनराईने नटलेला निर्मळ, नवाळे, वाघोली, गोम्सआळी परिसर शेती बागायतीच्या दृष्टीने अतिशय सुपीक होता. मात्र आर्थिक साधनसंपत्ती दळणवळणाची साधने इत्यादीच्या अभावी विकास कुंठीत झाला होता. दुसऱ्या बाजूने अज्ञान व शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा यामुळे येथील समाजाचा सांस्कृतिक व वैचारिक विकास खुंटला होता. भाजीपाला व दूध घेऊन मुंबईला जाणाऱ्या काही ठराविक कुटुंबातील व्यक्ती, तसेच नोकरी व कामधंद्यानिमित्त मुंबईला जाणाऱ्याची संख्या अगदी नगण्य होती. ह्याशिवाय उरलेला समाज शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर गुजराण करीत असे, अशा परिस्थितीत फार मोठा उत्कर्ष करता आला नाही. तरीपण आपल्या परिसरातील लोकांसाठी काही मार्गदर्शक धोरण आखता येईल का? त्यांच्या जीवनाचा सर्वांगीण विकास घडवून आणता येईल का? ह्या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन निर्मळ परिसरातील काही तरुण मित्र मंडळी एकत्र आली. त्यांनी रविवार दि. १४ सप्टेंबर १९५८ ह्या पवित्र क्रुसाच्या सणाच्या दिवशी त्यावेळचे होली क्रॉस चर्चचे प्रमुख धर्मगुरू ख्रि. रे. फादर जोसेफ व्हिक्टोरीया ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने जीवन विकास मंडळनामक सामाजिक संस्थेची स्थापना केली.

मंडळाच्या स्थापनेनंतर ख्रि. फादर व्हिक्टोरीया ह्यांनी आपल्या चर्चमधील निवासातील एक खोली मंडळाच्या कार्यालयासाठी व सभा घेण्यासाठी विनामोबदला वापरावयास दिली. संस्थेचे कार्यकर्ते अधूनमधून सभा घेऊन संस्थेच्या भवितव्याबाबत चर्चा करू लागले. सततच्या विचार मंथनानंतर परिसरातील समाजातील निरक्षतेचा अंधार दूर करण्यासाठी लोकांना वाचनाच्या माध्यमातून प्रगतीपथाकडे घेऊन जाता येईल यावर कार्यकर्त्यांचे एकमत झाले. त्यातूनच जीवन विकास मंडळाच्या कार्याचे पहिले बीज चेतना पुस्तकालयाच्या रुपाने १० जाने. १९६० रोजी रोवण्यात आले. त्याद्वारे अल्पशिक्षित समाज घटकाला जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी देण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरु झाला. परिसरातील आमजनतेची बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, कला व क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रात उन्नती घडवून आणण्याचे कार्य मंडळाने हातात घेतले. तसेच व्यक्ती व गट यांतील मतभेद मिटवून सलोखा, प्रेम व ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने जात, धर्म व पक्ष निरपेक्ष हेतूने मंडळाचे कार्यकर्ते प्रेरित झाले होते. संस्थेसाठी स्व. ब्राझ-अंतोन दालमेत यांच्या अध्यक्षतेखाली १० सभासदांची संस्थापक विश्वस्त समिती स्थापन करून जीवन विकास मंडळाची १९६१ साली धर्मदाय आयुक्त ठाणे ह्यांच्या कार्यालयात नोंदणी करुन संस्था पी.टी.ई. २३१-ठाणे ह्या क्रमांकाने संस्था रजिस्टर झाली.

संस्थेच्या कार्याची महती लोकांना पटू लागली. काही नवीन कार्यकर्ते ह्या कामी साथ देऊ लागले. व १९६१ साली ख्रि. रे. फा. डॉमनिक आब्रिओ (सहाय्यक धर्मगुरु पापडी चर्च) ह्यांच्या सहकार्याने ‘देवाची हाक हे पहिले नाटक आपल्या कार्यकर्त्यांनी निर्मळ चर्चवर सादर केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ३-४ वर्षे आपल्याच कार्यकर्त्यांनी आपले एक हितचिंतक कै. बाबी चांदरेकर ह्यांच्या दिग्दर्शनाखाली पहिल्या घरी‘, ‘माझी जमीन‘, ‘शिवकंकनइत्यादी नाटके निर्मळ चर्चवर सादर केली. त्यावेळी आपल्याकडे नाटकासाठी स्टेज नसल्याने आपल्याच कार्यकर्त्यांनी बांबू व फळ्या आणून स्टेज तयार करण्यास मदत केली.

१९६५ साली कु. जयमाला जोगळेकर (मुंबई) यांच्या जादुच्या प्रयोगाचा कार्यक्रम न्यू इंग्लीश स्कूल, वसई यांच्या पटांगणावर सादर करुन पोस्टर व पत्रकाद्वारे मंडळाच्या कार्याची माहिती सर्व वसईभर पसरविण्यात आली. नाटके व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून व सभासदांकडून नाममात्र वर्गणीतून मंडळाचा प्रशासकीय व पुस्तकालयाचा खर्च भागविण्याचा प्रयत्न केला जात असे. परिसरातील सर्व शाळांना व सर्वसामान्य जनतेला एकत्र आणून स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन वगैरे राष्ट्रीय सण एकत्र साजरे करण्याची प्रथा संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रात सुरू केली. परिसरातील रूग्णांना प्राथमिक उपचार मिळावा म्हणून १९६५ पासून आपल्या कार्यालयात प्रथमोपचार पेटी ठेवण्यात आली. कुठल्याही सामाजिक संस्थेला आर्थिक निधीशिवाय समाजकार्य करणे शक्य नसते हे लक्षात घेऊन, कार्यकर्त्यांनी आपल्या संस्थेचा नेहमीचा कार्यक्रम चालू ठेवून १९८७ साली मुंबईच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात लहानपण देगा देवाया नाटकाचे आयोजन केले. सर्व कार्यकर्ते जिद्दीने कामाला लागून हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याद्वारे संस्थेच्या निधीमध्ये मोठी भर पडली.

दिवसेंदिवस संस्थेच्या कार्याची महती वाढत गेली. तसतशी कार्यकर्त्यांच्या उत्साहात भर पडू लागली. आपल्या कार्यालयासाठी स्वतंत्र वास्तू असावी म्हणून निर्मळ व आसपासच्या परिसरात जागेचा शोध सुरु केला. परिसरातील ग्रामपंचायतीकडे सरकारी जागेसाठी विचारणा करता योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्या काळात चेतना पुस्तकालयाला ग्रामीण वाचनालय म्हणून ‘वर्ग मिळाला. सरकारी अनुदानात वाढ झाली. त्याबरोबरच नियमाची बंधनेही आली. वर्तमानपत्रे, पाक्षिके, मासिके इत्यादी वाचनाची साहित्य वाचकास उपलब्ध करणे, पुस्तकालय वाचकांसाठी दररोज चालू ठेवणे, या बंधनामुळे शाळेच्या वर्गात वाचनालय चालू ठेवणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे निर्मळ नाक्यावरील स्व. सालू कोरिया ह्यांच्या कोरिया सदन ह्या इमारतीत एक खोली भाड्याने घेऊन सन १९७० साली तेथे कार्यालयाचे स्थलांतर केले. सामाजिकशैक्षणिक व आर्थिक कार्याबरोबर कला व क्रिडेद्वारे तरूणांची शारीरिक जोपासना व्हावी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सन १९७० साली प्रगती कला-क्रीडा व मनोरंजन विभागाची स्थापना केली. या विभागाद्वारे क्रीडा विषयक कार्याचा प्रचार व प्रसार करून तरुणात खेळीमेळीची भावना निर्माण करण्यासाठी कबड्डी, हॉलीबॉल, क्रिकेट इत्यादी देशी विदेशी खेळ खेळले जात असत. क्रीडांगणावर संस्थेचे मानचिन्ह म्हणून एक ध्वज रोवला जात असे. त्यासाठी मंडळाचे कुशल संघटक श्री. डॉमणिक डिसोजा ह्यांनी विचारपूर्वक मंडळासाठी दोन रंगाचा व योग्य आकाराचा ध्वज करून घेतला. त्यामध्ये मंडळाच्या कार्याची ज्योत सतत तेवत ठेवण्यायोग्य असे बोध चिन्हे तयार केले. सोबत अहर्निश सेवा मयं‘ (सदासर्वदा सेवा) ह्या ब्रीद वाक्याचा समावेश केला. तसेच ध्वजविषयक आचार संहिता तयार केली.

कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह व कार्याला आलेली गती पाहता, आपल्या संस्थेला स्वतःची वास्तू असणे जरूरीचे होते. ह्यासाठी कार्यकर्त्यांनी खटपट चालू होती. त्याला यश आले. संस्थेचे प्रेरणादाते आणि सदैव संस्थेच्या पाठिशी उभे असलेले  स्व. बिशप आब्रिओ यांच्या प्रयत्नाने नवाळ्यातील श्रीमती जेबीबाई अंद्रेस करास व त्यांच्या कुटुंबीयांनी, त्यांची आई स्व. इजमलबाई फरशा कोन ह्यांच्या स्मरणार्थ नवाळे उघडी जवळील रस्त्यालगतची साडेतीन गुंठे जागा सवलतीच्या दराने संस्थेला दिली. ही जागा नावी करणे व बिगर शेती (एन.ए.) करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते श्री. देगू डाबरे ह्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. जागा मिळाल्यावर संस्थेचे कार्यकर्ते सुंदर वास्तूचे स्वप्न पाहू लागले. त्यासाठी निधी जमविण्याचे मार्ग शोधू लागले. संस्थेचे एक हितचिंतक श्री. सुरेश अंधारीकर (मुंबई) ह्यांच्या सहकार्याने होली क्रॉस हायस्कूलच्या रंगमंचावर सुर राहू दे‘ ‘वाहतो ही दुर्वाची जुडी‘, ‘अश्रूंची झाली फुलेवगैरे प्रसिद्ध नाटके सादर करण्यात आली. सोबत स्मरणिका प्रसिद्ध करून निधी जमविण्याचे काम चालू झाले. तसेच संस्थेच्या प्रत्येक वर्धापनदिनी निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून परिसरातील शाळा, तसेच होली क्रॉस हायस्कूल व निर्मळ विद्यालय येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत असे. गरीब मुलांना पुस्तकाचे व गणवेशाचे वाटप करण्यात येत असे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार व सन्मान केला जात असे. प्रसिद्ध लेखकांची व विचारवंताची व्याख्याने आयोजित करणे, तसेच राज्य जिल्हा व तालुकास्तरीय सरकारी मान्यवरांना आमंत्रित करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली जात असे. एका वर्धापनदिनी महाराष्ट्र सरकारने पाच हजार रुपयाची देणगी देऊन संस्थेला गौरविले आहे.

मंडळाच्या कार्यक्षेत्रात मोडणाऱ्या गावात रस्ते, आरोग्यसेवा, शेतीविषयक सुधारणा, तसेच संबंधित नालासोपारा रेल्वेस्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर बाके, संडास, मुत्री, घड्याळ व शेड याच्या सुधारणांसाठी व गाड्याच्या फेऱ्या वाढविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार करून सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. एस.टी.चा नियमितपणा वाढविण्यासाठी तसेच निर्मळ येथे पोस्ट ऑफीस आणण्यासाठीही प्रयत्न केले. मंडळाच्या २०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार प्रा. सदानंद वर्दे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते. त्यांनी सरकारच्या वतीने दहा हजार रुपयांची देणगी मंडळाला दिली होती. त्यावेळी अध्यक्षपद रे. फा. जॉन रुमाव, प्राचार्य सेंट थॉमस बॅप्टीस्टा हायस्कूल, पापडी ह्यांनी भूषविले होते. त्यांनी त्यावेळी काही फर्निचर पुस्तकालयाला मिळवून दिले होते.

मंडळासाठी वास्तू बांधण्यासाठी जागेचा प्रश्न मार्गी लागला होता. निधी जमविण्याचे काम चालू होते. २ एप्रिल १९७८ रोजी वसईतील सुप्रसिद्ध दानशूर ख्रि. शेव्हलीयर ई. एस. अंड्राडिस ह्यांच्या शुभहस्ते कोनशिला बसविण्याचा समारंभ पार पाडला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. देगू डाबरे होते. ह्यावेळी आशीर्वाद विधीचे पौरोहित्य रे. फा. जॉन रुमाव, प्रमुख धर्मगुरू, होली क्रॉस चर्च निर्मळ ह्यांनी केले.

१९७९ साल हे जागतिक बालकवर्ष म्हणून युनोतर्फे घोषित करण्यात आले होते. त्यानिमित्त बालकांकरिता बाल चित्रकला प्रदर्शन व बालकांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या, तसेच बालकांसाठी बजरबट्टूहे प्रसिद्ध बालनाट्य सादर केले होते. संस्थेला मिळणाऱ्या देणग्या आयकर मुक्त असाव्या म्हणून विश्वस्त श्री. जोसेफ दालमेत यांच्या प्रयत्नाने प्राप्तीकर कायदा ८०-जीचे प्रमाणपत्र मिळवण्यात आले. कोनशिला समारंभ झाल्याबरोबर कार्यकर्ते निधी जमविण्याबरोबर बांधकामाला मदत करण्यासाठी सरसावले. दगड विटा व रेती वाहून नेणे. बांधकामाला पाणी मारणे वगैरे कामात त्यांनी तनमनधन अर्पण केले. ह्याबरोबर इतर विभागाच्या कामांची घोडदौड चालूच होती. १९८३ पर्यंत म्हणजेच संस्थेच्या रौप्य महोत्सवापर्यंत इमारतीच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले. २६ डिसेंबर १९८३ रोजी इमारतीचे उदघाटन व आशीर्वाद विधी औरंगाबाद, धर्मप्रातांचे बिशप आदरणीय स्व. डॉमनिक आब्रिओ ह्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. आलेक्स डाबरे हे होते. ह्या शुभप्रसंगी दानशूर ख्रि. शेव्ह. ई. एस. अंड्राडिस ह्यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. तर सदर समारंभास प्रमूख पाहुणे म्हणून मा. कै. पंढरीनाथ चौधरी, तत्कालीन आमदार, पूजनीय स्व. स्वामी स्वयंप्रकाश, मौन प्रकाश आश्रम निर्मळ, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुरेश ओबेरॉय, लायन हरपालसिंग, अध्यक्ष लायन्स क्लब जोगेश्वरी, बबनशेठ नाईक इत्यादी मान्यवर हजर होते. तळमजल्याचे काम पूर्ण झाल्यामुळे मंडळाचे कार्यालय व चेतना पुस्तकालय ह्या नवीन वास्तूत हलविण्यात आले. मंडळाच्या सर्व विभागाचे कामकाज सुरळीत चालू असताना १९९१ साली इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम हाती घेतले. त्याबरोबरच चेतना पुस्तकालयासाठी तळमजल्यावर कपाटे बांधण्याचेही काम हाती घेतले. चारपाच वर्षाच्या अथक प्रयत्नाने, देणगीदारांच्या उदार अंतकरणाने मंडळाच्या ३८व्या वर्धापन दिनी मे १९९६ साली इमारतीच्या पहिल्या माळ्याचे काम पूर्ण झाले. त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. सिल्वेस्टर दोडती होते. अमरावती धर्मप्रांताचे बिशप रे. एडवीन कोलासो ह्यांच्या शुभहस्ते आशीर्वाद विधी पार पाडला. त्यावेळी लायन आर्ची डिसोजा, उद्योजक, भाईंदर व माननीय श्री. शेजूळ साहेब, ग्रंथालय संचालक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

परिसरातील काही सन्माननीय व्यक्तीनी आपल्या कुटुंबातील स्वर्गवासी झालेल्या प्रिय व्यक्तींच्या नावे काही रक्कम शिष्यवृत्तीसाठी ठेव म्हणून ठेवली आहे. त्या ठेवीच्या व्याजापोटी येणाऱ्या रक्कमेतून गुणवंताना दरवर्षी वर्धापन दिनी शिष्यवृत्ती दिली जाते. तर काही गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत दिली जाते. इमारतीच्या पहिल्या माळ्याला पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून सिंमेट पत्रे टाकणे आवश्यक होते. तसेच पतपेढीला त्यांच्या कार्यालयासाठी मोठ्या जागेची गरज होती. त्यामुळे धर्मदाय आयुक्ताच्या परवानगीने आपला इमारतीचा पहिला माळा पतपेढीला वाजवी किंमत आकारुन कायम स्वरूपी देण्यात आला. दुसरा माळा सांस्कृतिक हॉल म्हणून तयार करण्यात आला. त्याठिकाणी संस्थेचे लहानमोठे कार्यक्रम होऊ लागले. ह्या हॉलचे उद्घाटन मंडळाच्या ४४व्या वर्धापनदिनी म्हणजे २५ मे २००३ ह्या दिवशी विधीपूर्वक झाले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. पास्कोल गोम्स हे होते. ह्या समारंभाचे अध्यक्ष रे. फा. मायकल डिसोजा, प्रमुख धर्मगुरू माहिम चर्च (मुंबई) व प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मायरा मेन्डोन्सा, महापौर मिरा-भाईंदर महानगरपालिका ह्या होत्या.

मंडळाच्या तरूण व उत्साही कार्यकर्त्यांमध्ये मंडळाच्या कार्याची ओढ निर्माण व्हावी, आपापसांत प्रेम व आपुलकी वाढावी म्हणून अधूनमधून त्यांच्यासाठी स्नेहसंमेलने आयोजित करुन मंडळाच्या भरभराटीसाठी निरनिराळ्या विषयांवर चर्चेचे आयोजन केले गेले. तरुणवर्गाला त्यांच्या नोकरी व्यवसायासाठी मार्गदर्शन म्हणून निरनिराळ्या व्यावसायिकांची मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जात.

मंडळाने सुवर्णमहोत्सवी वर्षी आजीव सभासद नोंदणीचा कार्यक्रम श्री. मनवेल रुमाव यांच्या नेतृत्वा-खाली हाती घेतला होता. त्याच्यासोबत श्री. आलेक्स डाबरे, फ्लोरियन रिबेलो व सिलू लुद्रिक यांच्या समितीने वर्षभर परिसराचा दौरा करून ३५० कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून मंडळाच्या कामकाजाविषयी माहिती दिली व ३१० सभासदांची नोंदणी केली.

मंडळाचा सुवर्णमहोत्सव सोहळा ०१ ते ०३ मे २००९ या तीन दिवसांत भरगच्च कार्यक्रमाने झाला. मुख्य उपक्रम असलेल्या चेतना पुस्तकालयातर्फे वाचन संस्कृती वाढविण्याकरिता संपूर्ण उत्तर वसईत भव्य ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली होती. या ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून ग्रंथ व वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी उत्तर वसईतील ५ ग्रंथालयांना व १२ गावांना वाद्यवृंदासह मिरवणुकीने भेटी देण्यात आल्या. या प्रसंगी एक ग्रंथरथ मिरवणुकीच्या मध्यभागी बँण्डपथकासह असल्यामुळे लोकांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. शनिवार ०२ मे २००९ रोजी मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी उपक्रमाचे देणगीदार व हितचिंतक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अंध कलाकारांचा ‘मेरी आवाजही मेरी पेहचान है हा सुरेल ऑर्केस्ट्राचा मनोरंजन कार्यक्रम विनामूल्य सादर करण्यात आला. रविवार ०३ मे रोजी सुवर्णमहोत्सवी वाटचालीतील मंडळाच्या कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पद्मश्री रे. फा. ज्यो परेरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या प्रसंगी सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त एक स्मरणिकाही प्रकाशित करण्यात आली.

मंडळाच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच उत्साही व तरुण कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यात वाव देण्यासाठी मंडळाच्या व्यवस्थापन योजनेत २०१२ मध्ये बदल करताना मंडळाचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य करण्यात आले तसेच विश्वस्त मंडळ सदस्यांची संख्या वाढवून १५ करण्यात आली. महसूल व जमिनीबाबत प्रशिक्षण शिबीर २१ फेब्रुवारी २०१६ रोजी तालुका विधीसाहाय्य व सल्ला समिती, वसई आणि मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात जमीन व्यवहार व शासकीय कागदपत्रे या बाबत शासनाच्या विविध कायद्यांची माहिती देण्यात आली.

दिवाळी सणानिमित्ताने काही वर्षे ‘दीपावली सुरसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदाबहार गीतांच्या या कार्यक्रमात वसई परिसरातील नामवंत गायक-गायिका आणि वादक सहभागी होत होते. परिसरातील दर्दी रसिकांची अलोट गर्दी या कार्यक्रमाला होती. २९ एप्रिल २०१८ रोजी वसई संस्कृती कला-संगीत संध्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वसईतील स्थानिक कलाकारांसह कादोडी, वाडवळ इ. स्थानिक मराठी भाषेतील लोकगीतांचे सरगमऑर्केस्ट्राद्वारे सादरीकरण झाले.

संस्थेचे विविध उपक्रम

संस्थेने मागील ६८ वर्षांत अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरू केले आहेत. 

चेतना पुस्तकालय

चेतना पुस्तकालय हे मंडळाच्या कार्याचा मानबिंदू आहे. १९६० साली ह्या वाचनालयाची स्थापना करण्यात आली. दर्जेदार आणि वाचनीय ग्रंथसंपदा, संदर्भ साहित्य व सेवासुविधांनी हे वाचनालय परिपूर्ण आहे. ग्रंथालयात महिला व बालकांसाठी स्वतंत्र अद्ययावत कक्ष तयार करण्यात आला आहे. जास्तीतजास्त वाचक आणि विशेषत: बालकांना आकर्षित करण्यासाठी ग्रंथालयातील मांडणी व आसन व्यवस्था आकर्षक करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. या वाचनालयात सर्व भाषिक मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, दिवाळी अंक आहेत, तर २७ हजारांहून जास्त ग्रंथ, पुस्तके आहेत. संदर्भग्रंथांची ५००० पुस्तके आहेत. इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असून त्याचा वापर विनामूल्य उपलब्ध आहे तसेच २४ तास खुली अभ्यासिका असून अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. वसई तालुक्यातील हे पहिले ‘अ’ वर्गीय ग्रंथालय असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय (ग्रामीण भाग) पुरस्कार सलग दोन वेळा मिळाला आहे.

सहकार फंड व पतपेढी

लोकांची आर्थिक कुचंबणा दूर करण्यासाठी १९६२ साली सहकार फंडाची स्थापना करण्यात आली. आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातूनही काटकसर करून बचत करण्याची सवय सहकार फंडाने परिसरातील नागरिकांना लावली. अत्यंत कष्टाने, निष्ठेने व सचोटीने अखंड २६ वर्षे कार्यकत्यांनी केलेल्या अर्थसाधनेचे १९८८ साली जीवन विकास नागरी सहकारी पतपेढीत रुपांतर झाले. सध्या या पतपेढीच्या संपूर्ण उत्तर वसईत सहा शाखा आहेत. कोकण विभागातून या पतपेढीस सहकारभूषण या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पतपेढीने स्थापनेपासून आजतागायत ऑडिट वर्ग टिकवून पालघर जिल्ह्यातील एक अग्रगण्य व आदर्श पतसंस्था म्हणून नाव कमावले आहे.

कला व क्रीडा विभाग

१९७० साली स्थापन झालेल्या कलाक्रीडा विभागाने गेल्या वर्षी आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे केले. तरुणांसाठी खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या संस्थेमार्फत क्रीडास्पर्धा भरवण्यात येतात. कला-क्रीडा विभागातर्फे गेली काही वर्षे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दिपावली सूरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच कोरोनाचा कहर आटोपल्यानंतर भव्य एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्याचे विचाराधीन आहे. तसेच योगाचे प्रशिक्षण वर्ग चालू करण्यात आले आहेत.

महिला विभाग

महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने महिला विभाग १९९० पासून कार्यरत आहे. हा विभाग पूर्णत: महिला सांभाळत असून यामध्ये एकूण १०१ महिला सभासद आहेत. गेली काही वर्षे महिलांसाठी महिलादिनाचे औचित्य साधून भव्यस्तरीय मेळावे आयोजित करण्यात येतात. यामध्ये महिलांसाठी प्रबोधन व करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात येतात. तसेच इतरही अनेक जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येतात.

स्व. बिशप आब्रिओ

मेडिकल रिलिफ ॲॅन्ड रिसर्च सेंटर

निर्मळ परिसराचे भाग्यविधाते स्व. बिशप आब्रिओ ह्याच्या स्मरणार्थ वैद्यकीय निधीची स्थापना करण्यात आली असून परिसरातील गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. तसेच अनेक आरोग्य शिबिरे भरवून अल्प दरात आरोग्य सुविधा परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात. आतापर्यंत या विभागाद्वारे अडीच कोटीहून अधिक रक्कमेचे आर्थिक सहाय्य गरजू रुग्णांना करण्यात आले आहे.

जीविका शिक्षण निधी

पतपेढीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या जीविका शिक्षण निधीतून समाजातील दुर्बल घटकांना तसेच पतपेढीच्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल सभासदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य करण्याची योजना सुरू केली आहे. या निधीचा सुयोग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने व पतपेढीच्या सर्व स्तरावरील सभासदांना यात सामावून घेण्याच्या दृष्टीने शिक्षण निधीतून प्राथमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक व पदवी पदव्युत्तर शिक्षण यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. आजपर्यंत या निधीतून पाऊण कोटीहून अधिक रक्कम आर्थिक सहाय्य म्हणून गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे.

जीविका विवेक मंच

दैनंदिन जीवनात अनेक ज्वलंत प्रश्नांवर सर्वसामान्य नागरिकांना योग्य भूमिका तयार करण्यासाठी व विचार प्रवृत्त करण्यासाठी किंबहुना व्यक्त होण्यासाठी मंडळाने उचललेले हे पुरोगामी पाऊल आहे. दर रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत अनेक ज्वलंत प्रश्नांवर आणि चालू घडामोडींवर चर्चा होते. या चर्चेत कोणीही लहानथोर भाग घेऊन त्या त्या विषयावर आपले मत मांडू शकतात. वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, विज्ञान, समाजकारण, राजकारण, धर्म असे विविध मुद्दय़ांवर प्रत्येक रविवारी चर्चा होत असते.