स्व. बिशप आब्रिओ मेडिकल रिलिफ ॲन्ड रिसर्च सेंटर

निर्मळ परिसराचे भाग्यविधाते स्व. बिशप आब्रिओ ह्याच्या स्मरणार्थ वैद्यकीय निधीची स्थापना करण्यात आली असून परिसरातील गरजू रुग्णांना औषधोपचारासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. तसेच अनेक आरोग्य शिबिरे भरवून अल्प दरात आरोग्य सुविधा परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जातात. आतापर्यंत या विभागाद्वारे अडीच कोटीहून अधिक रक्कमेचे आर्थिक सहाय्य गरजू रुग्णांना करण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील विविध समाजोपयोगी कार्य करीत असताना संस्थेने लोकांना, आरोग्यविषयक माहिती, मार्गदर्शन, सरकारी सवलती व आर्थिक मदत मिळावी म्हणून सतत प्रयत्न केले. सन १९६६ साली परिसरात सर्वांगाला खाज सुटण्याच्या साथीचा प्रादुर्भाव झाला होता, अशावेळी सार्वजनिक आरोग्य खात्याचे लक्ष वेधून योग्य ती उपाययोजना केली. तसेच सोपारे येथील सरकारी रुग्णालयात पोलिओची लस व ट्रीपलची इंजेक्शने उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न झाले त्यात संस्थेचाही महत्वाचा वाटा होता. सन १९७९-८० ह्या वर्षात होली क्रॉस चर्च निर्मळ येथील व्हिन्सेंट डी पॉल सोसायटीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. रक्तदात्यांकडून उपलब्ध झालेले रक्त गरजू व गरीब आजाऱ्यांना उपयोगी पडावे म्हणून त्यांना कार्ड वाटप करण्यात आले. मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ५ नोव्हेंबर १९८३ रोजी नेत्र चिकित्सा व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. लोकांना रक्तदानाचे महत्त्व पटल्यामुळे बऱ्याच लोकांनी रक्तदान केले. ह्याकामी मुंबईच्या भगवती हॉस्पिटलच्या ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. संस्थेचे दरवर्षी निरनिराळे कार्यक्रम चालू असताना, दिनांक २६-०४-१९८७ रोजी आपल्या इमारतीमध्ये डॉक्टर दिलीप चौधरी ह्याच्या सहकार्याने अर्धवेळ वैद्यकीय शिबीर भरविले होते. त्यात नामवंत नेत्र चिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते. परीसरातील बऱ्याच गरजवंतानी त्याचा फायदा घेतला.

            असाध्य अशा रोगानी पीडित असलेल्या रुग्णामध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी म्हणून गांधीजयंतीच्या निमित्ताने दिनांक २ ऑक्टोबर १९९१ रोजी वालीव येथे जयप्रकाश नारायण कुष्ठरोगी वसाहतीमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचा एक संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम आयोजित करुन, तेथील रुग्णासोबत कार्यकर्त्यांनी स्नेहभोजन घेतले. ह्या कार्यक्रमाला १२५ स्त्री- पुरुष कार्यकर्ते हजर होते. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यासाठी जनजागृती करण्यासाठी आपली संस्था वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करते व रक्तदाते त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देते. दिनांक १ ऑक्टो. १९९५ रोजी माननीय डॉ. जोसेफ डिसोजा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व मुंबईच्या कामा हॉस्पिटलच्या ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यात १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले होते.

            समाजातील दुर्बल घटकांसाठी संकटसमयी आर्थिक मदतीचा हात देता यावा, आजारपण व तत्सम कामासाठी सुलभतेने आर्थिक मदत उपलब्ध व्हावी म्हणून सन १९९७-९८ सालच्या ४०व्या वार्षिक सभेत स्व. बिशप आब्रिओ मेडिकल रिलिफ अॅण्ड रिसर्च सेंटरची स्थापना करुन ह्या अगोदरची आरोग्यविषयक सर्व कामे त्यात समाविष्ट करावीत म्हणून एक ठराव समंत करण्यात आला. गरजवंताना रक्ताचा योग्य तो उपयोग व्हावा व जास्तीत जास्त लोकांनी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावे म्हणून १ ऑक्टोबर १९९८ रोजी दसऱ्याच्या शुभदिनी के.ई.एम. रुग्णालयाचा रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर भरविण्यात आले होते. ह्यावेळी १३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले व रुग्णांना तातडीने १५ बाटल्या रक्त उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच स्व. बिशप आब्रिओ मेडीकल फंडाच्या निधीत स्मरणिकेद्वारे भर घालण्यात आली. हा निधी ५ लाख रुपयांपर्यंत जमवून आजारी व गरवंताना मदतीचा हात देता यावा म्हणून प्रयत्न सुरु केले. १९९९-२००० सालामध्ये जीवन विकास नागरी सहकारी पतपेढीने आपल्या दशवार्षिक सोहळ्यानिमित्त ह्या फंडाला रु.१.३७ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला. तसेच ग्रामस्थांनी प्रत्येकी रु.१००० रुपये भरुन फंडाचे सभासदत्व स्विकारले. समाजातील दुर्धर आजाराने पीडित व आकस्मिक अपघातात सापडलेल्या व्यक्तींना मोठ्या रकमेच्या वैद्यकीय मदतीची गरज असते ह्यासाठी जास्तीत जास्त देणगी गोळी करता यावी म्हणून निधी रु. ५ लाखावरुन रु. २५ लाख असावा असा निर्णय संस्थेने घेतला, आतापर्यंत ६६ लाख रुपये जमा झाले आहेत. या निधीच्या व्याजातून २५० हून जास्त रुग्णांना वैद्यकीय सहाय्य गरजूंना वाटप करण्यात आले.

            २००१-०२ ह्या वर्षात मेडीकल रिसर्च सेंटरने निर्मळच्या विन्सेंट डी पॉल ह्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने १४ ऑक्टो. २००१ रोजी के.ई.एम. हॉस्पीटलच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सन २००६-०७ ह्या आर्थिक वर्षात मीरारोडच्या भक्तिवेदांत हॉस्पीटलच्या सहाय्याने संस्थेने आपल्या हॉलमध्ये २८ नोव्हेंबर २००६ व २६ फेब्रुवारी २००७ रोजी दोन नेत्रचिकित्सा शिबिरे आयोजित केली होती. ह्या शिबिरात १६२ रुग्णांनी आपल्या डोळ्याची तपासणी करुन घेतली त्यापैकी १५ रुग्णांच्या डोळ्यावर भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. भक्तिवेदांत हॉस्पिटलचे नेत्रशिबीर संयोजक श्री. राजेंद्र अंजारकर, तसेच हॉस्पिटलचे डॉ. जैन व वसई पंचायत समितीचे सदस्य श्री. थॉमस फिगेर, गास ह्यांनी या कामी मोलाचे सहकार्य केले. तसेच वेळोवेळी नेत्र चिकित्सा शिबीर, डायबीटीस तपासणी शिबीर, कॅन्सर शिबीर, दंतचिकित्सा, हृदय रोंग तपासणी शिबीर, ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र व पॅनकार्ड शिबीर अशी अनेक शिबिरे आयोजित केली.