महिला विभाग
महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने महिला विभाग १९९० पासून कार्यरत आहे. हा विभाग पूर्णत: महिला सांभाळत असून यामध्ये एकूण १०१ महिला सभासद आहेत. गेली काही वर्षे महिलांसाठी महिलादिनाचे औचित्य साधून भव्यस्तरीय मेळावे आयोजित करण्यात येतात. यामध्ये महिलांसाठी प्रबोधन व करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात येतात. तसेच इतरही अनेक जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येतात.
मंडळाच्या सामाजिक कार्याला गती यावी यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक आहे हे जाणून आपल्या संस्थेने २३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत १९८१ मध्ये महिला विभागाची स्थापना केली. आपल्या परिसरातील बहुतेक स्त्रिया ह्या अर्धवट शाळा सोडून शेती व्यवसाय करीत असत, त्यांना फावल्या वेळात काही व्यवसाय करता येईल का? जेणेकरुन रोजच्या घरखर्चाला हातभार लागेल. ह्यावर विचार करुन १९८६ साली आपल्या इमारतीमध्ये मंडळाच्या २७व्या वर्धापनदिनी शिवणकलेचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यासाठी संस्थेने देणगीदारांच्या सहकार्याने चार शिवणयंत्रे आणली व शिवणकलेच्या स्त्री-मार्गदर्शकांच्या मदतीने दुपारच्या फावल्या वेळात हे वर्ग चालू करण्यात आले. या उपक्रमास पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु संस्थेने आपली चिकाटी सोडली नाही. स्त्रियांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपले जे अनेक प्रश्न आहेत ते ह्या विभागामार्फत सोडवावे, म्हणून ३२व्या वार्षिक सभेत सौ. आग्नेस थॉमस डाबरे ह्यांची अध्यक्ष व कु. छाया लोपीस ह्यांची चिटणीस म्हणून निवड करुन या विभागाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी २६ जानेवारी १९९० रोजी काही महिलांनी एकत्र येऊन तयार कपड्याचे विक्रीकेंद्र आपल्या संस्थेच्या इमारतीमध्ये सुरु केले. महिलासाठी, बालकांसाठी व इतर घरगुती वापरासाठी लागणाऱ्या कपड्याची विक्री सुरु केली. त्यादिवसापासून महिलांनी परिसरातील गावात फिरून १५६ महिलांकडून ह्या विक्री केंद्रासाठी भांडवल जमा केले. त्यावेळचे होली क्रॉस हायस्कूलचे प्राचार्य रे.फा. टोनी कोरिया ह्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यासाठी लागणाऱ्या गणवेशाचे कापड शाळेत आणून विकण्याचे काम महिला विभागाला दिले. पुढे काही वर्षांनी योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने हे विक्रीकेंद्र बंद करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला. परंतु परिसरातील महिलांना संस्थेच्या कार्यालयात एकत्र आणून त्यांना मार्गदर्शन करुन, त्यांचे सामाजिक कार्यासंबंधीचे प्रबोधन घडवून आणण्याचे कार्य मात्र चालूच ठेवले. या कामी श्री. देगू डाबरे यांनी विशेष पुढाकार घेतला.
महिलांनी मंडळाच्या कार्याशी निगडीत रहावे व त्यांच्यात वेळोवेळी चर्चा घडवून यावी म्हणून दि. २४-०३- १९९४ रोजी मंडळाच्या कार्यालयात महिला विभागाच्या अध्यक्षा सौ. मागरिट फर्नांडिस ह्यांनी एका शिबिराचे आयोजन केले होते. महिलासाठी गृहउद्योग म्हणून, लायन्स क्लब ऑफ जोगेश्वरी ह्यांनी प्लास्टीकच्या दोरीपासून पिशव्या बनविण्याची कल्पना महिला मंडळासमोर ठेवली होती. दिनांक २१-०५- १९९५ रोजी मंडळाच्या सभागृहात रे. फा. फ्रान्सिस दिब्रिटो, सुवार्तेचे त्यावेळचे संपादक, ह्यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे रे. फा. अॅण्ड्रयू रॉड्रिक्स चर्चा करताना म्हणाले की, “शेतीच्या हंगामाव्यतिरिक्त उरलेल्या वेळात कपडे शिलाई किंवा लघुउद्योग म्हणून पापड, लोणची व मसाले बनवून एखाद्या संघटनेमार्फत विक्री करावी.” असे सांगताना शेतीच्या कामकाजाबाबत कोसबाडच्या कृषिविद्यालयातर्फे माहिती मिळवून देण्यास मदत करीन असे सांगितले. परिसरातील पाण्याच्या विहिरीमधून बिल्डर लॉबी पाणी उपसून नेत असे. त्यामुळे पिण्याचे पाणी क्षारयुक्त झाले होते. त्यासाठी महिलांनी स्व. पशीबाई लोपीस ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी आंदोलन छेडले होते. महिला विभागातर्फे महिलांनी बरीच मेहनत घेऊन नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. ह्यावेळी इतर महिलांना मंडळाच्या खर्चाने कार्यालयात आणून नेत्रचिकित्सा करवून घेतली. सन १९९८-९९ ह्या वर्षात दिनांक १६ जून रोजी होली क्रॉस चर्च महिला सोड्यालिटीच्या सहकार्याने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्त्रियांनी आर्थिक व कौटुंबिक जबाबदारी तसेच सामाजिक कार्यात सहभाग ह्या विषयावर चर्चा झाली. आजही आपली संस्था महिलांची निरनिराळ्या पदावर निवड करुन सहकार्याची अपेक्षा करीत आहे.
२००९ साली महिला विभागाने गृहउद्योगांतर्गत वसईतील स्थानिक प्रथा परंपरा वा खाद्य संस्कृती जतन करणे व त्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे या दुहेरी हेतूने खाद्यपदार्थ व पक्वान्ने तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला होता.