सहकार फंड व पतपेढी
लोकांची आर्थिक कुचंबणा दूर करण्यासाठी १९६२ साली सहकार फंडाची स्थापना करण्यात आली. आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातूनही काटकसर करून बचत करण्याची सवय सहकार फंडाने परिसरातील नागरिकांना लावली. अत्यंत कष्टाने, निष्ठेने व सचोटीने अखंड २६ वर्षे कार्यकत्यांनी केलेल्या अर्थसाधनेचे १९८८ साली जीवन विकास नागरी सहकारी पतपेढीत रुपांतर झाले. सध्या या पतपेढीच्या संपूर्ण उत्तर वसईत सहा शाखा आहेत. कोकण विभागातून या पतपेढीस सहकारभूषण या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पतपेढीने स्थापनेपासून आजतागायत ऑडिट ‘अ’ वर्ग टिकवून पालघर जिल्ह्यातील एक अग्रगण्य व आदर्श पतसंस्था म्हणून नाव कमावले आहे.
गेल्या साठ वर्षापूर्वीचा आपल्या निर्मळ परिसराचा इतिहास आपल्या नजरेसमोर आणला असता, फार थोडेच लोक नोकरी व इतर व्यवसायानिमित्त मुंबईला जात येत असत. काही लोक आपला उदरनिर्वाह शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नावर करीत असत. त्यांच्या भविष्याची आर्थिक तरतूद करण्यासाठी आपल्या परिसरात कुठल्याही बँकेच्या शाखा, पोष्ट ऑफिस नव्हते किंवा कुठल्याही सहकारी संस्था नव्हत्या. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतीच्या हंगामासाठी किंवा लहान मोठ्या आजारांच्या डॉक्टरी उपचारासाठी किंवा अत्यंत निकडीच्या व अडीअडचणीच्या वेळी गरजूंना दामदुप्पट व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागत असे. ह्या गोष्टीचा आपल्या संस्थेच्या त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी सांगोपांग विचार केला. मंडळाच्या तिसऱ्या वर्धापनदिनी निर्मळ येथील दालमेतवाडी ह्या निसर्गरम्य ठिकाणी आपल्या परिसरातील कार्यकर्त्यांचा एक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आपल्याच संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तयार केलेला सूत्रबद्ध आर्थिक आराखडा सादर करण्यात आला. आपण स्वावलंबनाने व काटकसर करुन इतरांना प्रोत्साहन देऊन त्याद्वारे बचत करुन, परस्परांना सहाय्य करावे, अडीअडचणींच्या वेळी गरजवंताना अल्पदरात स्वतःच्या ऐपतीवर किंवा तारणावर योग्यवेळी कर्ज उपलब्ध करुन द्यावे या विचाराने सहकार फंडाची स्थापना, १ एप्रिल १९६२ साली करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला.
सुरुवातीला अवघ्या २७ वर्गणीदार सभासदांनी भाग घेतला. आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातून काटकसर करुन दरमहा रुपये तीन ते पाच अशी गुंतवणूक करुन आपल्या भविष्यकाळासाठी तरतूद करु लागले. त्या फंडाची महती परिसरातील लोकांना पटू लागली व अनेक स्त्री पुरुष आपल्या उत्पन्नातून ठराविक रक्कम दरमहा ह्या फंडात जमा करु लागले. आपल्या बचतीचा हिशेब मिळावा म्हणून प्रत्येक वर्गणीदाराला वार्षिक कार्ड देण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या दरमहा जमा होणाऱ्या वर्गणीचा तपशील नोंद होऊ लागला. ह्या आर्थिक बाबीची नोंद घेण्यासाठी सहकार फंडाचे पहिले चिटणीस म्हणून संस्थेचे संस्थापक सदस्य व विश्वस्त श्री. अंतोन लुद्रिक ह्यांची निवड केली. त्यांच्या मदतीला गावातून वर्गणी गोळा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती चिटणीसाच्या मदतीने वर्गणी गोळा करणे, तारणावर कर्ज मंजूर करणे, उत्पन्नानुसार सभासदास वार्षिक लाभांश मंजूर करणे वगैरे कामे करीत असे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रत्येक वर्षी अथवा दर दोन वर्षानी चिटणीस व समितीमध्ये फेरबदल केले जात असत. सहकार फंडाच्या स्थापनेपासून ते १९८८ साली त्याचे जीवन विकास नागरी सहकारी पतपेढीत रुपांतर होईपर्यंत पुढील कार्यकर्त्यांनी फंडाचे चिटणीसपद भूषविले आहे.
१) स्व. ब्राझ-अंतोन दालमेत २) स्व. श्री. मनवेल रुमाव ३) स्व. फ्रान्सिस दालमेत ४) स्व. सिलू लुद्रिक ५) स्व. अंतोन करास ६) खंडू मास्तर ७) सालू दालमेत ८) आलेस रुमाव ९) लुईस डिसोजा १०) मायकल आल्मेडा ११) सिलू दोडती
सहकार फंडात श्री. फ्रान्सिस दालमेत ह्यांनी अनेक वर्षे चिटणीसपद सांभाळले. संस्थेचे हे सर्व पदाधिकारी कोणत्यही प्रकारचा मोबदला न घेता आपले काम प्रामाणिकपणे करीत असल्यामुळे सहकार फंड आपल्या परिसरात सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरला होता.
सोन्याचे तारण व दप्तर सुरक्षित ठेवण्यासाठी एक स्टील कपाट खरेदी करण्यात आले होते. चिटणीसाच्या घरी सदर कपाट ठेवण्यात येत असे. त्याबद्दल मोबदला जरी नसला तरी नाममात्र मानधन देण्याचा प्रयत्न केला जात असे. सहकार फंडाचा हा व्यवहार जवळ जवळ २६ वर्षे आपल्या संस्थेने चालविला. या फंडाचे वैशिष्ट्य म्हणजे इतक्या दीर्घकालीन लाखो रुपयांच्या प्रचंड व्यवहारात कोणताही गैरव्यवहार, थकबाकी अथवा बुडीत कर्जाचा प्रकार झाला नाही. वर्गणीदार सभासदांना प्रत्येक वर्षी योग्य असा लाभांश त्याच्या बचत रकमेवर मिळत होता. याशिवाय सभासदांना किंवा परिसरातील गरजवंताना त्यांच्या अथवा तारणावर विनाविलंब कर्ज मिळण्याची सोय होती.
गरीब विद्यार्थी शिक्षण सहायक फंड
आपल्या संस्थेच्या परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक विवंचनेमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये. म्हणून त्यांच्यासाठी पुस्तके, वह्या व गणवेश मिळावा म्हणून सहकार फंडाच्या उत्पन्नातून काही निधी बाजूला काढून २०व्या वर्धापन दिनी गरीब विद्यार्थी शिक्षण सहाय्यक फंडाची स्थापना करण्यात आली. प्रत्येक वर्षी मंडळाच्या वर्धापनदिनी परिसरातील शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश वाटण्याचा कार्यक्रम नित्यनेमाने सुरु केला. १९८३ साली मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ४१ विद्यार्थ्यांना गणवेश व वह्या वाटण्यात आल्या होत्या. ३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्व. बिशप आब्रिओ ह्यांच्या स्मरणार्थ अपंग व गरीब विद्यार्थ्यांना सहाय्य व्हावे म्हणून ह्या निधीमध्ये भर घालण्यासाठी सरचिटणीस श्री. आलेस रुमाव व विश्वस्त श्री. देगू डाबरे ह्यांनी विशेष प्रयत्न केले.
सहकार फंड हा जीवन विकास मंडळाची अंतर्गत बाब असल्यामुळे आर्थिक उलाढालीमध्ये व वार्षिक अहवालामध्ये व्याजाच्या उत्पन्नाची नोंद होऊ लागल्याने धर्मदाय आयुक्ताकडून त्याच्यावर कर आकारण्यात येऊ लागला. मंडळाला हा कर भरणे अवघड होऊ लागले. आर्थिक उलाढाल वाढली, सोन्याचे तारण व रोख रक्कम सांभाळण्याची योग्य अशा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. विनावेतन काम करणाऱ्या चिटणीसांना आपले कुटुंब सांभाळून ही जबाबदारी पार पाडणे कठीण होऊ लागले. तसेच फंडाच्या व्यवहाराबरोबरच ह्या विभागाने चालू केलेल्या गरीब विद्यार्थी सहायक फंडाची जबाबदारीही चिटणीसांना सांभाळावी लागे. ह्या सर्व गोष्टीचा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सारासार विचार करुन सन १९८८ साली या फंडातून सहकार कायद्याखाली रीतसर पतसंस्था स्थापन करायचा निर्णय घेतला.
अत्यंत कष्टाने, निष्ठेने व सचोटीने अखंड २६ वर्षे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्थसाधनेचे रुपांतर दि. ९ डिसेंबर १९८८ रोजी जीवन विकास नागरी सहकारी पतपेढीत झाले. याचे सारे श्रेय सहकार फंडाला जाते. सहकार फंडाचे बहुतेक सभासद पतपेढीचे स्वेच्छेने भागधारक झाले. तसेच त्यांनी आपली फंडातील संचित रक्कम पतपेढीमध्ये ठेवरुपाने ठेवली. त्यामुळे पतपेढीची आर्थिक उलाढाल वाढली. पतपेढी सहकारी संस्था कायद्याप्रमाणे जरी चालत असली तरी जीवन विकास मंडळ परिवारातील समजली जावी, असे मत पतपेढीच्या स्थापनेच्या वेळी त्यावेळचे जीवन विकास मंडळाचे प्रमुख विश्वस्त श्री. देगू डाबरे ह्यांनी व्यक्त केले होते.
ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. आलेक्स डाबरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या पतपेढीच्या प्रवर्तक व संस्थापक संचालकांनी अत्यंत परिश्रमपूर्वक काम करुन पहिल्या पाच वर्षात पतपेढीच्या ठेवी रु. १८.६५ लक्ष, कर्जे रु. २५.८७ लक्ष, नफा रु. ७० हजार व खेळते भांडवल रु. २४.१६ लक्ष रुपये उभारून लक्षणीय कामगिरी पार पाडली.
१९९९ साली पतपेढीने आपला दशवार्षिक सोहळा साजरा केला. त्यावेळी सत्पाळा येथे नवीन शाखा सुरु करण्यात आली. सदर सोहळ्यात मंडळाच्या व पतपेढीच्या कार्यकर्त्यांना मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उत्तर वसईत पतपेढीच्या मुख्य कार्यालयासह एकूण सात शाखा उत्कृष्टपणे सेवा देऊन प्रामाणिकपणे कोट्यावधी रुपयाचा व्यवहार हाताळत आहेत. हजारो सभासदांनी भाग भाडंवल खरेदी केले आहे. ह्यासाठी पदाधिकारी, संचालक मंडळ व हितचिंतक तसेच प्रामाणिक कर्मचारीवर्ग गौरवास पात्र आहेत. म्हणूनच पतपेढी स्थापनेपासून आजतागायत ऑडिट ‘अ‘ वर्ग टिकवून सहकार क्षेत्रात एक आदर्श पतसंस्था म्हणून नावारुपास आली आहे. पतपेढी ही जीवन विकास मंडळाच्या सेवाभावी परंपरेची पाईक ठरली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील चांगले काम करणाऱ्या सहकार क्षेत्रातील संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१५ पासून सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ अशा पुरस्कारांची सुरवात केली त्यासाठी शासनाने प्रस्ताव मागितले. गेली काही वर्षे आपली पतपेढी ह्या पुरस्कारासाठी प्रस्ताव तयार करून पाठवित आहे आणि आनंदाची बाब म्हणजे पूर्ण वसई तालुका, पालघर-ठाणे, जिल्हा व कोकण विभागातून या पुरस्कारासाठी आपणांस नामांकन (Nomination) मिळाले आहे. हा एक प्रकारे आपल्या पतपेढीच्या व मंडळाच्या कार्याचा गौरव आहे.
पतपेढीची आर्थिक सद्य:स्थिती
शाखा : ७ + मुख्यालय
कर्मचारी : ४०
सभासद : १३८८२
ठेवी : रु. २३१.०० कोटी
कर्जे : रु. १०२.०६ कोटी
उलाढाल : रु.३३४ कोटी
निधी : रु. ३२.५१ कोटी
भागभांडवल : रु.११.३० कोटी
ऑडीट वर्ग : सतत ‘अ‘ वर्ग
पतपेढीने २०१३ या वर्षी आपल्या अर्थसेवेचा रौप्य महोत्सव साजरा केला.