जीविका विवेक मंच

दैनंदिन जीवनात अनेक ज्वलंत प्रश्नांवर सर्वसामान्य नागरिकांना योग्य भूमिका तयार करण्यासाठी व विचार प्रवृत्त करण्यासाठी किंबहुना व्यक्त होण्यासाठी मंडळाने उचललेले हे पुरोगामी पाऊल आहे. दर रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत अनेक ज्वलंत प्रश्नांवर आणि चालू घडामोडींवर चर्चा होते. या चर्चेत कोणीही लहानथोर भाग घेऊन त्या त्या विषयावर आपले मत मांडू शकतात. वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, विज्ञान, समाजकारण, राजकारण, धर्म असे विविध मुद्दय़ांवर प्रत्येक रविवारी चर्चा होत असते.

दैनंदिन जीवनातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर सर्वसामान्य नागरिकांना योग्य भूमिका तयार करण्यासाठी विचार प्रवृत करण्याकरीता विवेक मंचाची स्थापना रविवार दिनांक २९ मार्च २०१३ रोजी करण्यात आली. ‘विवेकवाद आणि सामाजिक परिवर्तनया विषयावर २८ एप्रिल २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या व्याख्यानाच्या वेळी त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. आज समाजात लिंगभेद, स्त्रियांवर होणारे अत्याचार, भोगवाद, चंगळवाद, व्यसनाधीनता, असुरक्षितता, अंधश्रद्धा, आर्थिक विवंचना अशा अनेक समस्या आहेत. अशा समस्यांवर चर्चा करून त्यांच्या मुळाशी जाण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ दुसऱ्याला किंवा समाजव्यवस्थेला दोष देण्यापेक्षा स्वतःला काही करता येईल का? या विचारातून जीविका विवेकमंचा” ची स्थापना झाली आहे. दर रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत या विवेक मंचाचे सभासद मंडळाच्या कार्यालयात एकत्र जमतात. सर्वानुमते एका विषयाची निवड करतात, त्यावर सर्वांगाने विचारविनिमय केला जातो आणि उपचारात्मक दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याची आखणी केली जाते. या मंचाचा कोणीही धार्मिक किंवा राजकीय पुरस्कर्ता नाही. हे जातपात, धर्म, राजकारण विरहित असे जनतेचे मुक्त व्यासपीठ आहे. इथे ज्यांना समाजातील समस्यांची जाण आहे, असे लोक एकत्र येतात, समस्या मांडतात, सर्वजण विचारविनिमय करतात. आपला विवेक जागृत करून इतरांना याची जाणीव व्हावी म्हणून प्रयत्न करतात.

विवेकमंचाच्या माध्यमातून विविध नवीन व्यक्ती मंडळाशी जोडल्या गेल्या आहेत तर बरेच जण मंडळात सक्रिय कार्यकर्तेही झाले आहेत. विवेकमंचाद्वारे वेळोवेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेल्या पाच वर्षात आयोजन केलेले विशेष उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे विविध जादूटोण्यामागचे शास्त्रीय प्रात्यक्षिक करून  दाखवणारे, ‘चमत्कारांचे सादरीकरणहा शहाजी भोसले, अनिंस ह्यांचा प्रबोधनपर कार्यक्रम, फा. व्हेन्सी डिमेलो ह्यांचे धर्म आणि विवेकह्या विषयावर व्याख्यान, फा. हिलरी फर्नांडिस ह्यांचे धर्माविषयी व्याख्यान, ‘जादूटोणा विरोधी कायदा आणि धर्मातील चमत्कारसंबंधी परिसंवाद. सहभाग : फा व्हेन्सी डिमेलो, फा मायकल जी, अॅड. विल्यम फर्नांडिस, सचिन थिटे (अनिंस), ‘सॉक्राटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकारामह्या अतुल पेठे दिग्दर्शित रिंगणनाट्याच्या प्रयोगाचे निर्मळ नाक्यावर आयोजन, ‘देहदान व अवयवदानह्या विषयात पुरुषोत्तम पवार ह्यांचा कार्यक्रम. हा कार्यक्रम मंडळाने प्रथम आयोजित केला होता. डॉ जोसेफ डिसोजा हेही ह्या कार्यक्रमात सहभागी होते. ह्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती बऱ्याच गावात झाली, “अवयवदान- देहदान काळाची गरज” या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. यूपीएससी / एमसीएससी स्पर्धापरीक्षा संबंधी श्री. विजयकुमार कलवले (MPSC) ह्यांचे प्रबोधन, भारतीय संविधानाचे अभ्यासक प्रा अरविंद निगळे ह्यांचे व्याख्यान, खास शालेय मुलांसाठी विज्ञानातील प्रश्नोत्तराचा खुला कार्यक्रम गेली दोन वर्षे मंच हा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवित आहे. बऱ्याच मुलांचा ह्यात उत्स्फूर्त सहभाग असतो.

त्याचबरोबर ज्यांना दर रविवारी मंडळात मंचाच्या सभेस भाग घेणे शक्य नाही त्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. ह्या अभिनव उपक्रमात देश-परदेशातील तसेच विविध स्तरांतील लोकांचा सहभाग आहे. विविध विषयावर आपापले मत बिनदिक्कतपणे मांडणे हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून हे माध्यम मंचातर्फे वापरले जाते. मंडळाच्या ह्या मंचाची विविध स्तरावर दखल घेतली गेली आहे. ‘महाराष्ट्र थिंक वेब पोर्टलचे श्री. दिनकर गांगल ह्यांनीही ह्या उपक्रमाविषयी कौतुक व्यक्त केले आहे.

सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीविका विवेक मंचाचे एक क्रियाशील कार्यकर्ते डॅनियल मस्करणीस यांचे विवेकमंचाच्या कार्यक्रमांवर आधारित लेखन महाराष्ट्रातील नामवंत वैचारिक साप्ताहिक साधनाने नियमित मालिकेच्या स्वरूपात प्रसिद्ध करायला सुरूवात केली आहे. सदर लेखनाची दखल साधनाच्या चोखंदळ व चिकित्सक वाचकांनी घेतली आहे. त्यातून मंडळाची वैचारिक ओळख अनेक विवेकी लोकांना झाली आहे. त्यातून विवेक मंचला नवीन सभासद मिळाले आहेत. वाटस्अप ग्रुपवर देखील काही नामवंत लोक सहभागी झाले आहेत.

जीविका विवेक मंच हा केवळ मंडळाचा एक विभागाच नसून समाजाच्या भविष्याला दिशा देणारा एक प्रभावी THINK TANK ठरेल याविषयी शंका नसावी.